Cross-Column

Saturday, February 8, 2020

ते तुझे सरकार तू त्याचा लाभार्थी


ते तुझे सरकार तू त्याचा लाभार्थी

लेखक ; प्रा. डॉ विधिन कांबळे.
सांगोला महाविद्यालय, सांगोला 
                        
                                                 कथेतील पत्र परिचय   -              वृक्षराज –वड
                                                 लिम्बाराम                              लिंबाचे झाड
                                                 घुम्या                                      घुबड
                                                 गोल  पायाचे छोटे राक्षस        छोटी वहाने
                                                 गोल पायाचे मोठे राक्षस -         ट्रक, बस 
                                                 यांत्रिक हात         -                   जेसीबी
                                                 साप               -                        डांबरी सडक 


सगळीकडे अंधार दाटला होता. आज आकाशात चांदण्यासुद्धा अंधुक अंधुक दिसत होत्या. चंद्र पुरता उगवला होता परन्तु तोही ढगांच्या आड गेला होता. त्यामुळे अंधार अधिकच गडद वाटत होता. कोठे कसलाच आवाज होत नव्हता.  रोज किरकिर करणाऱ्या रातकिड्यांचासुधा आज आवाजऐकू येत नव्हता. सर्वत्र अगदी भयाण शांतता पसरली होती.   
त्या अंधारात मध्यभागी पाठीवर पांढरा पट्टा असणारा सडक नावाचा काळा साप अस्ताव्यस्त पसरला होता.  अंधुक प्रकाशात तो काळा साप आणखीनच काळा वाटत होता. त्या काळ्या सापाच्या पाठीवरून गोल पायांचे राक्षस कर्कश आवाज करत येत जात होते. त्यांच्या गोलाकार डोळ्यातून आग बाहेर पडत होती. आणि याच काळ्या सापाच्या बाजूला एकच भले मोठे लिंबाचे झाड उभे होते. त्याचा आकार फारच विचित्र वाटत होता. झुंजणाऱ्या कोंबड्याच्या मानेवरची पिसे फिसकटावीत तशा त्याचा फांद्या अस्ताव्यस्त विस्कटल्या सारख्या दिसत होत्या त्यामुळे अंधारात ते झाड आणखीनच भेसूर दिसत होते. लिंबाचे झाड भेदारल्यासारखे वाटत होते.
लिंबाच्या झाडाच्या पलीकडच्या बाजूला शेजारीच एक भले मोठे वडाचे झाड जमीनदोस्त झालेले दिसत होते. नुकतेच अंधार पडण्यापूर्वी माणूस नावाच्या राक्षसाच्या एका समूहाने त्याची हत्या केली होती. वडाच्या झाडणे त्यांच्याशी कडवी झुंज दिली होती. अखेरच्या क्षणापर्यंत प्रतिकार करीत होते. पण त्या राक्षसांच्या बरोबर एक भला मोठा यांत्रिक हात आणि यांत्रिक करवत वृक्षराजावर चहूकडून प्रहार आणि वार करीत होते. शेवटी वृक्षराजाच निभाव लागला नाही. त्या राक्षसाशी झुंजत टिकून रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न अखेर निष्फळ ठरला. त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. शेकडो वर्ष तपश्चर्या करून “अमरत्वाचे वरदान” लाभलेले ते “वृक्षराज वड” जमिनीवर कोसळले. पश्चिमेकडून  येणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकीबरोबर त्यांची पाने थरथर कापत होती. पानाची सळसळ हंबरडा फोड्ल्यासारखी वाटत होती. वृक्षराज रक्त बंभाळ झाले होते. अजूनही त्यांच्या जखमा ताज्या होत्या. त्या जखमातून पांढरा द्रव पाझरत होता. त्यांचे हातपाय  थरथर कपात असल्याचे जाणवत होते. त्याचे प्राण कोवळ्या पानातून निघून जाण्याची वाट पहात होते. त्याच्या वाढलेल्या पारंब्या एखाद्या जटेसारख्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.  एकूणच तेथील ते दृश्य भयानक वाटत होते.
 दिवस मावळताना लिंबाच्या झाडाने  पाहिलेली “मानवराक्षस” आणि वृक्षराज यांच्यातील घनघोर लढाईने त्याच्या मनात दहशत निर्माण केली होती. आजची रात्र फक्त मध्ये होती. उद्या कारण आता त्याचाच नंबर होता. दिवस उगवायला ते राक्षस पुन्हा येणार होते, आणि काळ्या सापाच्या कडेला असलेला कित्येक वर्षापासून अस्तिवात असलेला एकुलता एक वारसदार जमीन दोस्त करणार होते.
 हळूहळू अंधार दाटू लागला. सर्वत्र विचित्र अशी शांतता होती. एवढ्यात झाडाच्या फांदीवर काहीतरी फडफड झाली आणि एक भला मोठ्या डोळ्याचा पक्षी टोकावरच्या फांदीवर येऊन बसला. तो पक्षी लिंबाच्या फांदीवर बसताच ती कटकन मोडली. पुन्हा फडफड झाली. आणि तो पक्षी पुन्हा सावरत दुसऱ्या फांदीवर बसला. ते मोठ्या डोळ्यांचे भले मोठे घुबड होते. लीम्बरामला खूप चीड आली होती. दिवसभर पाहिलेला नरसंहार त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्या मानवराक्षसाने केलेली आपल्या बांधवांची कत्तल त्याने पहिली होती. त्यामुळे घुबडाच्या येण्याने त्याला आणखीनच अस्वस्थ वाटायला लागले. तो चिडला होता.
“कशाला आला आहेस माझ्याकडे? तुला सांगितले होतेना. माझ्याकडे येऊ नको म्हणून.  का आलास मला त्रास द्यायला. चल बरं चालतो हो तुझ्या नेहमीच्या झाडावर.” लीम्बाराम चिरक्या आवाजात ओरडला. त्यामुळे घुबड अर्थात घुम्या गांगरून गेला होता.
“माझं थोडंस ऐकून घेशील का? घुम्या विनवणीच्या सुरात बोलू लागला.
“मला तुझं काही एक ऐकायचे नाही. तू आपला जा बरं तुझ्या नेहमीच्या जागेवर. आज मला एकांत
हवा आहे.” लीम्बाराम रागाने बोलू लागला.
घुम्याची अवस्था खूपच केविलवाणी झाली होती.  लिम्बाराम ! कुठं जाऊ मी. तू मला जिथं जायला सांगतो आहेस. ते झाड आता तिथं नाही.  ते झाड माणूस नावाच्या राक्षसाने केव्हाच जमीनदोस्त केलय. आता मला फक्त तुझाच आधार आहे. कारण फक्त तूच एकटा या भयाण नागमोडी काळ्या सापाच्या कडेला उभा आहेस. आता या उजाड माळावर फक्त ‘तू’ आणि ‘मी’ दोघेच उरलो आहोत.” घुबडाचा गळा भरून आला होता. त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले होते.
झाड आधीच मनातून भेदरले होते. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्याचा ही कंठ दाटून आला होता. ते डोळे मिटून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करीत होते. पुन्हा घुबडाने झाडाला आवाज दिला.

मानव राक्षसाने केलेला खून 


“लिम्बाराम !  बोलत का नाहीस. अजून तुझा माझ्यावरचा राग गेला नाही का? मला माहित आहे तू का रागावला आहेस. मी, त्या वडाच्या झाडाची स्तुती करायचो म्हणून. त्या झाडाने अनेक वादळाशी सामना केला होता. माझ्या कित्येक पिढ्यांना त्याने आधार आणि आसरा दिला होता. त्याच झाडाच्या ढोलीत मी लहानाचा मोठा झालो होतो. त्या झाडाचे माझ्यावर अनंत उपकार होते. म्हणून मला वडाच्या झाडाची आपुलकी वाटत होती. म्हणून मी त्याचे गुणगान करायचो. ताचे उपकार होते माझ्यावर. अरे लिम्बाराम ! मी माणूस नाही; केलेले उपकार विसरायला. जरी तू माझा राग-राग करायचा तरीही मी अधून मधून तुझ्याकडे यायचो. तुला चिडवायला. मग तू चिडला की मलाही खूप मजा वाटायची. लिम्बाराम तू बोलत का नाहीस. खरंच माझा त्रास वाटतो तुला. ठीक आहे. जातो बाबा. वाट फुटेल तिकडे आणि नशीब नेईल तिकडे. पुन्हा नाही येणार त्रास द्यायला.” घुबड उडण्याच्या तयारीत असतानचा झाडाणे आवंढा गिळला व घुम्याला रोखण्यासाठी विनवणी करू लागला.  
“थांब घुम्या ! जाऊ नकोस. माझ्या बोलण्याचा तुला राग आला का ? मला माफ कर. तुला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. मी तरी काय करणार. या राक्षसाच्या करणीमुळे मी व्याकूळ झालो आहे. भयभीत झालो आहे. या सापाच्या कडेला मी आधीच मी एकटा पडलोय. तू गेलास तर मग मी कुणाशी बोलू. तू आलास; खूप बरं केलं. घुम्या मित्रा, खरं सांगायचं तर मला तुझा कधीच राग येत नव्हता. मी मुद्दामच तुझ्यावर रागवायचे नाटक करायचो. या सापाच्या पाठीवरून छोटी-मोठी गोल पायाचे राक्षस येत-जाता कर्कश आवाज करायची. या यंत्राचे डोळे आग ओखायचे. पण त्याचे चटके बसत नसले तरी निवांत झोप लागत नसायची. तुझा आवाज आला की; मी समजायचो,  आता बहुतेक शांतता सुरु झाली आहे. मग कुठे डोळा लागायचा. तुझा आवाज कानावर पडल्याशिवाय झोपच लागत नसायची.” घुबडाने आपले पंख फडफडवले आणि आनंदून मोठ्याने घू-घू असा आवाज केला.
“इतके दिवस नाही बोललास. उलट मला तू धुडकावून लावायचास. किती भयानक आवाज करतो म्हणून मला चिडवायचा.  माझ्या आवाजामुळेच तू मला घुम्या म्हणतोस.”
“तुला सांगितले ना, मी मुद्दाम  तसे करायचो. उलट किती गोड वाटतो तुझा आवाज. घुम्या ! ये घुम्या ! पुन्हा एकदा आवाज करना. कारण, मला आता कुणाचाच आवाज नको आहे. घुम्या तुझ्या अनेक पिढ्यांचे आवाज मी माझ्या कानात साठवले आहेत. तुझाही आवाज मला माझ्या कानात साठवून ठेवायचा आहे.” तेवढ्यात लांबून येणारे गोलाकार झोत लीम्बाराम्ला याच दिशेने येत असल्याचे दिसले.  
“ते बघ घुम्या ! गोल पायाचे राक्षस यायला लागलेत.  त्याच्या डोळ्यातून बाहेर पडणारी आग मला दिसते आहे.  
एकामागून एक छोट्या-मोठ्या राक्षसांच्या पोटात बसून ते माणूस नावाचे राक्षस याच दिशेने येत आहेत.” जस-जसे गोल पायाचे राक्षस जवळ येऊ लागले तस तसे झाड थरथरू लागले. आगीचे लोळ सरळ लिंबारामच्या अंगावर पडत होते. आधी-मधी कुठलाच अडथळा नव्हता. त्या आगीच्या उजेडात काळ्या सापाच्या दोन्ही बाजूला अनेक झाडांची प्रेत पडलेली दिसत होती. कुणाचे डोके छाटले होते. कुणाचे अर्धे अधिक हात तोडले होते तर कुणाचे पाय तोडले होते. काळ्या सापाच्या दोन्ही बाजूला नुसता प्रेतांचा खच पडला होता. जवळच भल्या मोठ्या ऋषीतुल्य वडाच्या झाडाचे पाय तोडलेले प्रेत अतिशय भयंकर दिसत होते. शेकडो वर्ष तपश्यर्या  करून वाढलेल्या त्याच्या जटांची विटंबना केली होती. अमरत्वाचे वरदान मिळालेल्या ऋषीला मानवराक्षसाने क्रूरपणे ठार केले होते.
तो अमर असल्याचा वडाला खूप गर्व होता. पण त्याचे आज गर्वहरण झाले होते. मानवी राक्षसाने त्याला जमीनदोस्त केले होते.  त्याच्यात अजून जीव होता. पानाची थोडीफार हालचाल दिसत होती.   डोळे अर्धवट मिटले होते. तो समजून गेला होता की ही शेवटची घटका आहे. तो आपला भूतकाळ आठवत निपचिप पडून होता.  
“घुम्या, कान गच्च दाबून धर. त्या आवाजाने तुझ्या कानठळ्या बसतील. कदाचित तुझ्या कानाचा पडदाही फाटून जाईल. तू कानात बोटं घाल आणि डोळे मिटून घे. त्या राक्षसांच्या डोळ्यातील आग तुझ्या डोळ्यात गेली तर तू कायमचा आंधळा होशील. डोळे घटत मिटून घे. चल लवकर.  हवं तर माझ्या पानांच्या आड दड.” लीम्बारामबेभान होऊन मोठयाने ओरडत होता. 
लीम्बाराम बेभान झाला होता. त्याला काही सुचत नव्हते. ते मोठ-मोठ्याने ओरडून आपल्या एकुलत्या एका साथीदाराला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. घुबडाला आपल्या कुशीत घेतले व आपल्या पानांनी त्याचे डोळे घट्ट झाकले.गोल पायाचे राक्षस त्या काळ्या सापाच्या पाठीवरून दूरपर्यंत निघून गेल्याची खात्री झाल्यावर झाडणे घुबडाला फांदीच्या आडून बाहेर येण्यास सांगितले.)   

“अरे लीम्बाराम ! साक्षात तुझा मृत्यू जवळ आला असताना मला वाचवण्याचा प्रयत्न करतोस. लिम्बाराम, तुझं काळीज किती मोठे आहे. मला माफ कर मी तुला खूप छळले. आज मला पश्चाताप होतो आहे. तुला उगीच चिडवले मी. मला माफ कर.”

आता घुबडाला अश्रू अनावर झाले आणि तो मुसु-मुसू रडू लागला. इतका वेळ धीट असल्याचे नाटक करणाऱ्या झाडाच्या मनाचा बंध फुटला आणि ते ही ढसा-ढसा रडू लागले. खूप वेळ दोघेजण रडत होते. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हते.  
“घुम्या, झोपलास काय?”  “बोलत का नाहीस?”

“नाही रे लीम्बाराम,  माझी तर झोपच उडून गेलीय. आज दुपारी पाहिलेली दृश्य डोळ्यापुढून
हालत नाहीत. किती क्रूर हा राक्षस आहे. त्याच्याकडे द्या-माया काहीच नाही. आपल्या स्वार्थासाठी आपल्या कित्येक भाऊ-बांधाचा सर्वनाश केलाय. त्या राक्षसांनी या सापाच्या दुतर्फा असलेली वनराई भुईसपाट केली आहे. शेकडो वर्षे उन्हाळे-पावसाळे झेलून तुफानाशी तोंड देत खंबीरपणे  उभे होतो. हजारो पक्षी या वनराईत आपला निवारा करीत होते. त्यांच्या कित्येक पिढ्या या वनराईने पहिल्या होत्या. चिव-चिवट आणि किलबिलाट नाहीसा झालाय. कुठे गेली असतील ते चिमुकले जीव. खरच माणूस नावाचा राक्षस किती निर्दय आहे. त्या राक्षसाने सगळं वैभव संपवून टाकले. नुसते वैभवच नाही तर नुसता नरसंहार केलाय. मी माझ्या डोळ्यांनी तो पाहिलंय. त्या चिमुकल्यांची घरटी नेस्तनाबूत होताना काळीज तुटत होतं. झाडावर असलेली घरटी त्या राक्षसाला दिसली नाहीत. त्या घरट्यात असलेली चिमुकली बाळे त्यांना दिसली नाहीत. त्यांनी कशाचा ही विचार केला नाही. त्या राक्षसांनी एक भलामोठा यांत्रिक हात आपल्याबरोबर आणला होता. (घुबडाचा कंठ दाटून आला होता. त्याचा ओठातून एकही शब्द फुटत नव्हता.)  

“हो ! मीही पहिला आहे तो राक्षसी हात. त्याचे पाय गोलाकार नव्हते.  त्याला लोखंडी पट्याचे पाय
आहेत. त्याच्या छोट्याश्या पेटीत एक राक्षस बसलेला असतो. तो राक्षसी हात त्या माणूस नावाच्या राक्षसाच्या इशाऱ्यावर छोटी-छोटी वनराई मुळापासून उपटून काढत होता. जे विरोध करत होते त्यांचे त्याने तुकडे तुकडे केले. अगदी चेंदामेंदा करून टाकत होता. मी हे सारं इथून पहात होतो. माझ्या अंगाचा तर नुसता थरकाप उडाला होता.” 
दिवस मावळायला निघाला तेव्हा तो राक्षस वृक्षराज वडाच्या झाडाजवळ पोहचला होता. त्याच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने झाडावरचे सगळे पक्षी सैरभैर झाले होते.  घरट्यातील चिमुकली बाळे किंचाळत होती. आक्रंदत होती. घरट्यातल्या घरट्यात फडफडत होती. त्यांचे आई-बाबा धायमोकलून ओरडत होती. हवेत झेपावून आपल्या बाळांना पाठीमागे उडत येण्याचे आव्हान करत होते. पण त्या चिमुकल्यांच्या पंखात एवढे बळ नव्हते की, ते हवेत झेप घेऊ स्वतःचे प्राण वाचवू शकतील. त्यांच्या कलकलाट आणि चिवचिवट ऐकून माझ्याही मनात कालवत होते. त्यांच्या आई-बाबांना समजून चुकले होते  की, काळ आता जवळ आला आहे. चिमुकली बाळे त्या राक्षसाच्या तावडीतून सुटणार नाहीत. याची त्यांना खात्री झाली होती. त्यांच्या आई-बाबांनी आपल्या चिमुकल्यांचे रूप डोळे भरून साठून घेतले व काळजावर दगड ठेऊन जीवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मावळत्या सूर्याच्या दिशेने आकाशात भरारी घेतली. ती कायमचीच. पुन्हा परत  फिरून न येण्यासाठी.
खरंतर तो राक्षस वृक्षराजाचे रूप पाहून घाबरला होता. राक्षसाला काही सुचत नव्हते. कोणत्या बाजूने हल्ला करावा हेच कळत नव्हते. वृक्षराज डोळे मिटून स्वस्थ बसले होते. त्यांना खात्री होती कि हा राक्षस त्यांना काही करू शकणार नाही. कारण त्यांनी शेकडो वर्ष एकाच जागेवर उभे राहून तपशर्या  केली होती. त्या राक्षसाला ते क्षुल्लक समजत होते.
“हो,  मलाही तसचं वाटत होते. म्हणून मीही निश्चिंत होतो. मी माझ्या घराच्या दारातून हे सांर
पहात होतो. तो राक्षस वृक्षराजच्या भोवती गोल-गोल फिरत होता. कोणत्या बाजूने हल्ला करावा याचा मनसुबा बांधत होता. पण त्याला अंदाज घेता येत नव्हता. शेवटी त्याने थांबून मोठी डरकाळी फोडली आणि राक्षसी हाताने वृक्षराजाच्या खांद्यावरती वार केला. त्या बरोबर भूकंपाचा हादरा बसावा तसा थरकाप उडाला. वृक्षराजांचे संपूर्ण अंग थरथर कापायला लागले. माझ्याही घराला जबरदस्त हादरा बसला. माझ्याबरोबर माझी भावंडे किंचाळत घर बाहेर पडली. डोळ्यापुढे अंधारी येत होती. कुणाशी कुणाचा ताळमेळ राहिला नाही. वाट फुटेल तिकडे उडत होतो. मी कोणत्या दिशेने उडत चाललोय हेच मला समजत नव्हते. माझी चिमुकली भावंडे कुठे गेली कुणास ठाऊक. कशी असतील देव जाणे. परमेश्वरा, माझी भावंडे जिथे असतील तिथे सुरक्षित ठेव !” घुम्याच्या मनाचा बांध आता फुटला होता. 
“कशाला त्या परमेश्वरावर भरवसा ठेवतोस. त्याच्यावरच आजपर्यंत माझा विश्वास होता. पण तो तरी कुठे आला आपल्या मदतीला. त्या परमेश्वरानेच तुला, मला नि त्या मानवराक्षसाला पृथ्वीवर जन्माला घातले. तू नुसता हवेत उंचउंच भराऱ्या घेत उडत राहिलास. आणि आम्ही त्या राक्षसाची सेवा करत राहिलो. शेवटी काय तो स्वार्थी बनला आहे. त्याच्या स्वार्थासाठी आता तो कर्दनकाळ झाला आहे. या पृथ्वीवर या राक्क्षसाचेच राज्य आहे. त्याच्या मनाला येईल तसेच वागतो. आणि आता तर हा मानवराक्षस देवालासुद्धा घाबरत नाही. तेव्हा तुझ्या भावंडाचा विचार करणे सोडून दे आणि तुझ्या जीवाची काळजी कर.” लिंबारामने घुम्याची समजूत घातली.  
“लिम्बाराम, तू मला हे सांगतोस. अरे, मी माणूस नाही स्वार्थीपणे वागायला. किती झाले तरी ती
माझी भावंडे आहेत. त्यांच्या शिवाय मी जगू शकणार नाही.”
“तू आता कुणाचाही विचार करू नकोस. तुझ्या जीवाची काळजी आता तुलाच करावी लागेल. आणि तुझी भावंडे तुला भेटतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. कारण हा राक्षस ही पृथ्वी निष्पर्ण केल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच तुला सांगतो आहे. तो राक्षस इथपर्यंत येईपर्यंत तू निघून जा. लांब कुठेतरी जिथे हा राक्षस पोहचाणार नाही. लीम्बाराम कळकळीने बोलत होता.
“ते काही असो. मी तुझी साथ सोडणार नाही. मला माहित आहे. तो राक्षस उद्या सकाळी तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. तरीही तू काहीच घडणार नसल्यासारखे भासवत आहेस. कमाल आहे तुझी. अरे साक्षात मृत्यू समोर उभा असताना मला जीव वाचवण्यासाठी सल्ला देतोस. ते राक्षस उद्या तुला संपवतील. तुझे अस्तित्व संपून टाकतील. उद्या तू मला भेटणार नाहीस. तुझ्या फांदीवर मला बसता येणार नाही. आजची ही रात्र काळ रात्र आहे. ही रात्र संपली की तू मला कधीच भेटणार नाहीस. कुणास ठाऊक मी उद्या कुठे असेन. ते काही असो  मला आजची रात्र तुझ्या सहवासात घालवायची आहे. तुझ्या अनुभवांची शिदोरी बांधून घ्यायची आहे. आणि.........आणि  तुझ्या कुशीत शिरून मला मनसोक्त रडायचे आहे. लिम्बाराम, मला ढकलून लावू नकोस. (घुम्याचा कंठ पुन्हा दाटून आला होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नसतो. तो हमसू-हमसून रडू लागले. लीम्बारामच्या ही मनाचा बांध आता फुटला होता आणि तोही आता रडू लागला बराच वेळ दोघे रडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मग झाडणे सुस्कारा सोडला आणि ते बोलू लागले. )

“खूप खूप वर्षापूर्वी हा जो पसरलेला काळा साप दिसतो ना, त्या ठिकाणी छोटासा खडबडीत साप होता. तेव्हा ते वृक्षराज एकटेच सर्वात थोरले होते.  ते राक्षस लाकडी चाकाच्या यंत्रात बसून यायचे.  त्याला शिंगे असलेले प्राणी जुंपलेले असायचे. ते प्राणी लाकडी चाकाचे यंत्र ओढत न्यायचे. त्या लाकडी यंत्रात राक्षसाची छोटी छोटी पिल्लेही असायची. तसेच राक्षसाच्या बायकाही असायच्या. ते सगळे खूप हसत खिदळत असायचे. उन्हाच्या झळा लागायला लागल्या की वृक्षराजाच्या सावलीला थांबायचे. त्यांचे ते शिंगे असलेले प्राणी माझ्या बुंध्याला बांधायचे. तेव्हा मी लहान होतो.
अनेक राक्षस त्या सापावरून चालत जायचे. कधी-कधी खूप मोठा घोळका हातात पितळी वाट्या घेऊन मोठ-मोठ्याने कुठल्यातरी देवाचे गाणं म्हणायचे. त्यांच्या मागे लाकडी चाके असलेला पिवळाधम्मक चकाकणारा रथ असायचा. त्याला उभ्या कानाचे मानेवर केस असलेले प्राणी जुंपलेले असायचे. आणि त्या रथात कसलातरी मुखवटा ठेवलेला असायचा. राक्षसांच्या खांद्यावर भगव्या रंगाचे काठीला बांधले कापड असायचे. एखाद्या राक्षसाच्या गळ्यात लाकडापासून बनवलेले वाद्य असायचे. त्याच्या दोन्ही बाजूला कुठल्याश्या गरीब प्राण्याचे कातडे बसवलेले असायचे. त्याच्या तालावर पितळेच्या वाट्या एका ठेक्यात वाजवायचे आणि खूप मोठ्मोठ्याने देवाच्या नावाचा धावा करायचे. चालून-चालून दमल्यासारखे व्हायचे. मग उन्हाने थकून भागून वृक्षराजाच्या सावलीत विसाव्याला थांबायचे. आपल्या गाठोड्यात काहीबाही आणलेले  खायचे आणि झुळूझुळू वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी पिऊन थोडी विश्रांती घेऊन पुढे वाट चालायचे. जाताना ते वृक्षराजाच्या पाया पडायचे.” लीम्बाराम इतिहास सांगायला लागला.  
“असली नाटके त्या राक्षसानीच करावी जाणे. म्हणे त्यांच्या पाया पडायचे. शेवटी त्याच राक्षसानी वृक्षराजाला ठार केले ना ? हा राक्षस कुणालाही सोडणार नाही. अंधार पडला म्हणून तुझे प्राण वाचले. नाहीतर त्यांनी वृक्षराजानंतर तुझीही हत्या केली असती. समजलं का !”
“त्या देवाचीच कृपा म्हणायची. त्यामुळे तुझी भेट झाली. आजवर मी जे पाहिलं, अनुभवलं ते सर काही तुला सांगायची संधी तरी मिळाली. कारण तूच आता माझा अखेरचा वारसदार म्हणून माझ्या  अगदी माझ्या जवळ आहेस. घुम्या, आता तुला एक विनंती, सारखं सारखं मला उद्याच्या दिवसाची आठवण करून देऊ नकोस. खूप वेदना होत्तात मला. जे होईल ते बघत बसणं एवढच आपल्या हाती आहे. आपण या राक्षसाचे काहीही करू शकत नाही. कारण तो भस्मासुरासारखा क्रूर झालाय. त्याचे प्रायश्चित्त त्याला जरूर मिळेल.”
“त्याला कधी प्रायश्चित्त मिळणार आहे कुणास ठाऊक. पण त्या आधी आपला प्राण जाणार हे मात्र नक्की.”
     
“ घुम्या, जाऊदे ते सगळं. तुला एक गंमत सांगतो. मला आठवतं, तू खूप लहान असताना एका रात्री वाट चुकून माझ्याकडे आला होतास. त्यावेळी तुला धड नीट उडता ही येत नव्हते. तू माझ्या पायाजवळ पडला होता आणि आई-वडिलांना मोठ-मोठ्याने हाक मारत होता. आई वडील कुठे तरी लांब खाऊ आणायला गेले होते. ते मी पहिले होते. तू मात्र किरकिऱ्या आवाजात कावरा-बावरा होऊन रडत होतास. मी आपला शांत होतो- एवढ्यात माझ्या पायाला एक छोटासा उंदीर गुद्गुल्या करू लागला. मला तर खूप हसायला येत होते. पण मी हसू आवरून धरले होते. कारण मी हसलो  तर तू पुन्हा घाबरशील. मग तुझी नजर त्या पिटुकल्या उंदरावर पडली आणि तुझे रडणे बंद झाले.  तू खाली बसला होता. त्या पिटुकल्या उंदराने तुलाही पहिले. तो धावत तुझ्याकडे आला. तो जस-जसा जवळ येऊ लागला तस-तसा तू घाबरून लांब पळू लागला. मला तर तुझी खूप गंमत वाटली. मग मी तुला हळूच उचलून घेतले. घाबरू नकोस तो तुला काही करू शकणार नाही. तुला तो फक्त घाबरत असल्याचा आव आणतो आहे. उलट उंदीर तुझा खाऊ आहे. त्याला पकड आणि गट्टम  कर.  असं  मी तुला अनेक उदाहरण देऊन पटवून दिल्यावर खात्री झाली.  तरी ही तू घाबरत होतास. मी तुझ्यात हिम्मत निर्माण केली व तू त्या पिटुकल्या उंदराची शिकार केलीस. ती तुझ्या जीवनातली पहिली शिकार होती. आणि मी तुझा गुरु होतो.”
तेवढ्यात दुरून गोलाकार आगीचे लोळ उठताना दिसू लागले. झाड आता सावध झाले होते. ते घुबडाला सावध करीत म्हणाले.
“घुम्या, आधी ढोलीत जा बर. ते मोठमोठाल्या गोलाकार पायांचे राक्षस याच दिशेने येत आहेत. त्यांच्या गोलाकार डोळ्यातील ज्वालांनी तुझ्या डोळ्यांना इजा होईल. आणि तू कायमचा आंधळा होशील.”
“आता मला कशाचीच भीती वाटत नाही. मी म्हणतो बरं होईल हे डोळे कायमचेच गेले तर. निदान त्या राक्षसाचे पाप बघत बसण्यापेक्षा डोळे गेलेलेच बरे. पहावत नाही हा अत्याचार या उघड्या डोळ्यांनी,  आपल्याच बांधवांची घरे उध्वस्त होताना आणि या वनराईचा सर्वनाश होताना.”
“घुम्या असा भावनिक होऊ नकोस. ते गोल चाकाचे राक्षस खूप जवळ येऊ लागले आहेत. त्यांच्या गोल डोळ्यातून बाहेर पडणारे आगीचे लोळ मलाही जाणवू लागले आहेत.
(आवाजाचा कानोसा घेत) लिम्बाराम, “मी हा आवाज दुपारी ऐकला होता. तेच ते मोठ-मोठ्या
गोल-गोल पायाचे यांत्रिक राक्षस आहेत. ज्यामध्ये तुझ्या भावबंधांचे तुकडे-तुकडे करून त्या राक्षसाच्या पाठीवर असलेल्या खळग्यामध्ये कोंबून भरताना मी पहिले होते.. धारदार शस्त्राने कचाकचा घाव घालून तुकडे तुकडे करताना मी त्या निर्दयी राक्षसांच्या टोळीला पहिले होते. ते राक्षस एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या हातात क्रूर आवाज करत चालणारी यांत्रिक तलवार होती. त्या तलवारीने ते सपासप वार करून वनराईची खांडोळी-खांडोळी करीत होते.”    
“ते काही असुदे. तू आधी माझ्या आड लप. मी पहातो काय आहे ते. पण तू  असा हट्टीपणा करू नकोस. आता तूच काय तो माझ्यासाठी आशेचा किरण आहे. तूच या  नरसंहाराचा साक्षीदार आहेस. या राक्षसांनी केलेलेल्या अत्याचाराचा एकुलता एक पुरावा आहेस. तू तुझ्या डोळ्यांनी कत्तल होताना पहिली आहेस. हा अत्याचाराचा धडा तुला मनात साठवून ठेवायचा आहे. आणि या अत्याचाराच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायच्या आहेत. त्यासाठीच तुला जगायचं आहे. घुम्या, तूला जगावच लागेल. कारण तुला या राक्षसाच्या अत्याचाराची गोष्ट पुढच्या पिढीला सांगण्यासाठी जगवाच लागेल.”
लिम्बाराम अत्यंत आवेश्यात बोलत होते. त्यानेच मग घुबडला जबरदस्तीने आपल्या ढोलीत ओढून घेतले. एवढ्यात त्या सापाच्या पाठीवरून आलेले ते मोठ्या गोल चाकाचे राक्षस कर्णकर्कश आवाज करून धड-धडत पुढे गेले.
बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हते. सर्वत्र शांतता पसरली होती. रोज किरकिर करीत कानठळ्या बसणारा आवाज करणारा रातकिडासुद्धा शांत शांत होता. एवढ्यात हुंदके देण्याचा आवाज येऊ लागला. घुबड ढोलीत बसून रडत होते. त्याला रडू आवरता येत नव्हते. मग झाडणे त्याला हळूच आपल्या कुशीत घेतले व त्याला आपल्या कोवळ्या पानांनी कुरवाळू लागले.)
“घुम्या, रागावलास माझ्यावर!. एक डाव मला माफ कर.”
“तू कोणत्या मातीचा बनला आहेस. अरे तुला माहित आहे की, आजची रात्र ही तुझ्यासाठी शेवटची रात्र आहे. उद्याचा सूर्योदय तू पाहशील कि नाही शंका आहे. तरी ही तू मला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहेस. एवढी शक्ती आणि साहस तुझ्यात कुठून आले. अरे, तू नसशील तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. तुमच्याशिवाय माझं जगणं शक्य नाही. मला कोण निवारा देईल. मला कोण अंग-खांद्यावर खेळवलं. माझ्या पिढीचा उद्धार कसा होईल. त्यापेक्षा मीही तुझ्याबरोबर मारायला तयार आहे. एकदाच संपवून टाकू हे जीवन. मग तो राक्षस किती दिवस जगेल आपल्याविना ?”
“इतका भावनिक होऊ नकोस. माझं काय, मी खूप उन्हाळे-पावसाळे खाल्लेत. इतकी वर्ष जगलो हेच माझे भाग्य, नाहीतर या राक्षसांनी केव्हाच संपवले असते मला. खरंतर मलाही खूप जागावस वाटतंय. पण ते माझ्या हातात नाही. या राक्षसाला वाटते आहे कि या सृष्टीचा तोच राजा आहे. त्यामुळेच तो असा मनात येईल तसे वागत आहे. आज आपल्याला संपवेल आणि उद्या तोही संपणार आहे. याची त्याला कल्पना नाही. घुम्या, एकदिवस या राक्षसाला आपला शाप लागणार आहे. तो भस्मासुर पुन्हा जिवंत झाला आहे. त्याला कुणाचे ही वरदान लाभलेले नाही. तरीही त्याने या वसुंधरेवर थयथयाट मांडला आहे. तो आज मला जाळेल, उद्या तोच जळणार आहे. स्वत:हाच हात डोक्यावर ठेऊन.”
“लीम्बाराम, मघापासून तू भस्मासुराबद्दल सांगतोयस. भस्मासुर ही नेमकी काय भानगड आहे. जरा मला सांगशील का?”
“फार फार वर्षापूर्वी भस्मासुर नावाचा एक राक्षस या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याने देवांचा महादेव शंकराची खूप तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पाहून महादेव प्रसन्न झाला आणि साक्षात देव त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुझी भक्ती पाहून मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा तुला काय हवे ते माग. मी तुला देईन. मग त्या राक्षसाने डोळे उघडले. आणि देवाला नमस्कार केला. हे देवा तुम्ही मला दर्शन दिले. यातच मी धन्य झालो. मला काहीही नको. तेव्हा देव पुन्हा म्हणाला, तुझी भक्ती पाहून मी खूप खूप प्रसन्न झालो आहे. तुला जे वरदान मागायचे ते माग, माझा भक्त म्हणून मी तुला वरदान देतो.
“तो राक्षस खरच चागला असला पाहिजे. साक्षात देवाने त्याला काय हवे ते माग म्हटले, तरीही त्याने नकार दिला. नवलच म्हणायचे.” घुम्याने आश्चर्य व्यक्त केले.
“त्या राक्षसाने मुद्दामच तसे म्हटले होते. त्याने देवाजवळ अमर होण्याचे वरदान मागितले होते.”
“येवढा चांगला भक्त म्ह्टल्यावर देवाने हे वरदान दिले असेल.”
“नाही मुळीच नाही. देवाने अंतर्मनाने जाणले होते की, अमरत्वाचा वर दिल्यास हा सर्वाना छळेल. तेव्हा  देव म्हणाले, हा वर सोडून दुसरा वर माग.”
“मग राक्षसाने कोणता वर मागितला.”
“दिसेल त्याला भस्म करण्याचा वर.” लीम्बारामने पटकन सांगितले.
“बापरे ! भयंकरच म्हणायचे. दिसेल त्याला भस्म करायचे म्हणजे.....
“हो तर ! भयंकरच होते.”  त्या राक्षसाने देवाला सांगितले, की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. माझ्यापेक्षा कोणीही बलशाली असता कामा नये. मला या पृथ्वीवर राज करायचे आहे. तेव्हा देवा, तुम्ही मला हे वरदान ध्यावे.”
“मग देवाने वरदान दिले का?”
“शेवटी देवाचा ही नाईलाज झाला होता. कारण भष्मासुराने देवाची घोर तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले होते. आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करणे हे देवाचे कर्तव्यच होते. त्यामुळे देवाने त्याला भस्म करण्याचा वर दिला आणि अंतर्धान पावले.
“बापरे, भलताच वर दिला म्हणायचा देवाने. मग तो मेला नसेल ?”
“नाही, तो जिवंत नाही. तो आपल्याच कर्माने मेला.”
“ते कसं काय ?”
“त्याचे असे झाले. देवाने त्या राक्षसाला वर दिल्यामुळे त्याला मृत्यूचे भय राहिले नाही. तो पृथ्वीतलावरील सर्व जीवांना छळू लागला. तो प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेऊन भस्म करू लागला. अगदी देवांनासुद्धा ‘सळो की पळो’ करून सोडले होते.”
“देवांना सुद्धा छळायचा. म्हटल्यावर बाकीच्या राक्षसांची काय गत असेल, कोण जाने. बरं,
“अरे ते तर काहीच नाही. ज्या महादेवाने त्याला वर दिला त्या महादेवालाच भस्म करण्यासाठी निघाला. कारण त्याला कुणाचीही लुडबुड नको होती. त्याला या पृथ्वीवर राज करायचे होते. म्हणून तो महादेवाला शोधू लागला. भस्मासुराने स्वर्गावरच हल्ला चढवला. सर्व देवांना छळण्यास सुरुवात केली. सगळे देव भयभीत झाले  तो राक्षस आपल्यालाच शोधतोय म्हटल्यावर महादेवसुद्धा घाबरले. आणि इकडे तिकडे लपू लागले.”
“मग महादेव सापडले की नाही?
“नाही, शेवटी महादेव देवांचा देव विष्णूदेवाला शरण गेले आणि या संकटातून सोडवण्याची विनंती केली.”
“खुद्द देवावर आलेले संकट पाहून विष्णूदेवाने एक युक्ती लढवली. विष्णूने एका सुंदर नर्तकीचे रूप धारण केले. नर्तकीचे रूप पाहून तो राक्षस महादेवाला शोधण्याचे विसरून गेला आणि तो तिच्या पाठीमागे जाऊ लागला. राक्षसाने नर्तकीला नाव विचारले व माझ्याशी लग्न करशील का असा प्रश्न केला.”
“त्या राक्षसाची कमालच म्हणायची. ज्याने त्याला वर दिला त्यालाच भस्म करायला निघाला. बर ते जाऊदे ! तो मेला कसा?”
“नर्तकीने आपले नाव मोहिने सांगितले व भस्मासुराला अट घातली की जो कोणी मी चांगले नृत्य करणारा बरोबरच विवाह करणार आहे.”
“भस्मासुराला नृत्य करता येत होते ?”
“कुठलं नृत्य येतय त्याला. पण मोहिनेचे रूप बघून तो तिच्याबरोबर नृत्य करायला लागला ती करेल तसे बघून नृत्य करीत होता. असं खूप वेळ चालू होते. भस्मासुर मोहिनीच्या तालावर नाचत होता. आणि शेवटी मोहिनीने चाल खेळली.”
“कसली चाल ?”
“घुम्या, ;ल]त्या राक्षसाने कोणता वर मागितला होता.?
“ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल”
“अगदी बरोबर, नेमके हेच मोहिनीने केले. तिने नाचत नाचत हात आपल्या डोक्यावर नेला आणि भस्मासुराने तिचे अनुकरण केले. आणि स्वतःच जळून भस्म झाला. ‘तारणारा आणि मारणारा’ देवच आहे.” तोच तारतो आणि वेळ आल्यावर मारतो ही.”
“हा आता मला समजली भस्मासुराची गोष्ट. तू म्हणतोस तसाच हा मानवराक्षस जळून भस्म होईल.  या मानवराक्षसला पण देव मारणार? घुम्याने प्रश्न केला.
“नाही, देव याला मारणार नाही. तो आपल्याच कर्माने मरणार आहे. अगदी भस्मासुरासारखा. निदान भस्मासुराला देवाने वरदान तरी दिले होते. पण या मानवराक्षसाला देवाचे वरदान नाही. हा स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ मानायला लागलाय. तेव्हा तो एक दिवस मरणारच आहे. आपल्या पापी कृत्यामुळे तोसुद्धा  भस्म होणार आहे. लक्षात ठेव.” लीम्बाराम तळमळीने बोलला.
“तू म्हणतोस तसा हा मानवराक्षस या पृथ्वीवरून नष्ट व्हावा! म्हणजे आपल्याला गुण्या-गोविंदाने नांदता येईल.”
“थोडा धीर धर. हा राक्षस एक दिवस संपणार आहे.” तो सतत अत्याचार करीत सुटला आहे. या राक्षसाच्या अनेक टोळ्या आहेत. या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकाशी लढत असतात. पृथ्वीवर असणारे सगळे राक्षस एका जीवाने राहत नाहीत. ते आपल्या बांधावावारही अत्याचार करतात. ते खूप स्वार्थी असतात. आपल्या स्वार्थासाठी त्यांच्याच जातीतील राक्षसांचा बळी घेतात. या राक्षसाची एक म्हण आहे. “बळी तो कान पिळी”
“म्हणजे, राक्षसा राक्षसामध्येही फरक आहेत वाटतं.”
“हो तर ! आपल्यासारखा त्यांच्यामध्ये जिव्हाळा नसतो. आपण कधी कुणाला कमी लेखत नाही
की, कधी आपसात भांडत बसत नाही. हे राक्षस आपसात भांडत असतात. एवढच नाही तर ते एकमेकाचा जीवही घेतात.
“बापरे ! खुपच भयंकर आहे हा राक्षस. मला वाटायचे, हे राक्षस एका जीवाने रहात असतील. ते एकमेकांशी प्रेमाने वागत असतील.
“आता हे बघ. तुझच उदाहरण घे. तू रात्री बाहेर पडतोस आणि कावळा दिवसा घराबाहेर पडतो. तुला रात्रीच्या अंधारात जे मिळते त्यावर तू खुश असतोच ना ! कावळा दिवसाच्या उजेडात जे मिळेल त्याच्यावरच आपली गुजराण करतो की नाही. कधी कावळा तुला रात्री त्रास द्यायला येत नाही आणि तू दिवसा कावळ्याला त्रास देत नाही. आपल्याला दिलेल्या वेळा तुम्ही काटेकोरपणे आणि इमानदारीने पाळता की नाही. कधी कुणाची चोरी करीत नाही. कुणाचा घास हिरावून घेत नाहीत. निसर्गाने जे नियम आपल्याला घालून दिले ते आपण जसेच्या तसे पाळतो कि नाही.” लीम्बाराम समजावणीच्या सुरात बोलला.
 “तू म्हणतोस की, तुला मला आणि या राक्षसाला या निसर्गाने निर्माण केले. तुझी माझी उत्पत्ती देवाने केली. त्या तुझ्या देवाने की परमेश्वराने सर्वाना नियम घालून दिले तसे या राक्षसाला नियम घालून दिले नाहीत काय?”
“घुम्या, आधी मला एक सांग, तू का म्हणून देवाबद्दल तिरस्काराने बोलतोस. तो या सृष्टीचा निर्माता आहे. त्यानेच तुला नि मला या पृथ्वीवर निर्माण केले. त्याचे उपकार आहेत. नको असा देवाचा तिरस्कार करू.”
“मग काय त्याचे गुणगान गाऊ की, त्याची आरती करू. त्यानेच या दुष्ट राक्षसाची निर्मिती केली हे किती भयंकर आहे. म्हणे ‘मानव परमेश्वराची सुंदर निर्मिती.’ मी तर म्हणतो, तुझ्या देवाने या पृथ्वितालावर निर्माण केलेली अत्यंत क्रूर निर्मिती आहे.” मी तर म्हणतो, या राक्षसाला त्या देवाने परत बोलवावे. म्हणजे सर्वांची सुटका तरी होईल.  घुम्याने आपली जळमळीत प्रतिक्रिया व्यक्त केली.  
“आता देवाची गरज उरली नाही घुम्या ! हा राक्षस आपल्या कर्मानेच या सृष्टीतून हद्दपार होणार आहे. भस्मासुरासारखा, चिंता करू नकोस. तो दिवस लांब नाही.”
“ मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहीन.”
“ज्या पद्धतीने या राक्षसाने माझ्या बांधवांची कत्तल चालवलेली आहे त्या नुसार तो लवकरच मरणाच्या दारात आहे असे समज. त्याला माझ्या सर्व बांधवांचे श्राप लागतील. आणि तो गुदमरून मरेल, तेव्हा त्याला वाचवायला कोणीच नसणार आहे.”
“मी समजलो नाही ? तुझ्या श्रापाने कसा काय मारेल हा राक्षस. एवढीच जर ताकद तुझ्या श्रापात आहे, तर मग, आत्ताच का देत नाही श्राप. आम्हा सगळ्यांना या राक्षसाच्या त्रासातून मुक्त कर एकदाचे. तुझे खूप उपकार होतील.”
“तू म्हणतोस तसं काही होणार नाही. आणि श्राप देणे मलाही शक्य नाही. या राक्षसावर आमचे खूप उपकार आहेत. तो ते विसरला आहे. आमच्यामुळेच तो या पृथ्वीवर जिवंत आहे. हे त्याने निट समजून घेतलेले नाही.”
“तुमचे कसले उपकार आहेत या राक्षसावर ?”
“नुसते त्याच्यावरच नाही तर या पृथ्वीतलावर असलेल्या तुझ्यासारख्या करोडो जीवावर आमचे उपकार आहेत.”
“आम्ही कुठे तुम्हाला त्रास देतो.?” घुम्या खट्टू झाला.
“मी असं कुठे म्हटलय ! माझा राग राक्षस सोडून या निसर्गातील कुणावरही नाही. आणि त्तुझ्यावर तर आजिबातच नाही. कारण तू माझा दोस्त आहेस दोस्त..”
“आता कशाला लाडीगोडी करतोस. आधी म्हणाला की, तुझे माझ्यावर उपकार आहेत म्हणून. कसले रे उपकार केलेत माझ्यावर.”
“बरं ठीक आहे. घुम्या मला एक सांग, तू कशावर जगतोस ?
“अन्नावर. !”
“आणखी  ?”
“पाण्यावर !”
“आणखी ?”
“हा सूर्यप्रकाश !” इकडे तिकडे पहात घुम्या बोलला.
“आणखी ?”
“एवढेच तर लागतं आम्हाला जगायला. आणखी काही नाही.”
“याच गोष्टीचे दु:खं वाटते की आमचे योगदान कुणालाच दिसत नाही. अगदी तुलाही”
घुम्याच्या या उत्तराने लीम्बाराम मनातून खूप दु:खी झाला होता. इतका वेळ बडबड करणारा लीम्बाराम आता शांत झाला होता. घुम्याच्याही ते लक्षात आले. तो लीम्बारामला हळूच बिलगला आणि लाडीकपणे म्हणाला.  
“लीम्बाराम, तू बोलत का नाहीस. माझं काही चुकले का ?”
“मला या गोष्टीचे वाईट वाटले की, तू माझ्या इतका जवळ राहूनसुद्धा माझे आणि माझ्या बांधवांचे योगदान समजले नाही. अरे ! तूच काय पण या पृथ्वीतलावरचा कोणताही जीव आमच्याशिवाय जगू शकत नाही.” लिंबारामने आपल्या मनातील राग व्यक्त केला. घुम्यालाही आता लीम्बरामचा मनातून राग आला होता. तो जरा चढ्या आवाजात लीम्बारामला म्हणाला.
“तुझे कसले रे उपकार ? तू किंवा तुझे बांधव नेमकं असं काय करता ? अरे तुम्हाला साधे एका जागेवरून हलतासुद्धा येत नाही. जन्मभर एकाच जागेवर उभे असता. हा येवढं मात्र नक्की की, तुम्ही फळं  देता. राहिलं तर प्राणी पक्षांना निवाऱ्यासाठी जागा देता. यापेक्षा दुसरं काय करता. म्हणे उपकार आहेत. सगळ्या जीवांवर.” घुम्या उद्वेगाने बोलत होता.
घुम्याच्या बोलण्याने लीम्बाराम आणखीनच दु:खी झाला.
“तुझ्याकडून मी दुसरी काय अपेक्षा करणार ! दोष तुझा नाही. त्या राक्षसाच्या सानिध्यात राहून तुझीसुद्धा बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्या राक्षसाला माझे उपकार माहित आहेत. त्यालाही माहित आहे की, तो माझ्याशिवाय जगू शकत नाही.”
“तू म्हणतो तसं असते तर त्याने कशाला हा संहार केला असता ? बसला असता या वनराईच्या सावलीला. मला माहित आहे. तू मनातून घाबरला आहेस. उद्या तुझे अस्तित्व या जगातून संपणार आहे. जाता-जाता काहीतरी सांगायचे म्हणून तू असा बोलतोस.” घुम्या चिडून बोलला.
घुम्याच्या बोलण्याने लीम्बाराम आणखीनच अस्वस्थ झाला होता. तो मनातून आणखीनच व्याकूळ झाला. घुम्याचे शब्द त्याच्या पानांच्या चिंधड्या करून गेल्यासारखे वाटत होते. तो खूप दुखावला गेला. स्वतःला सावरत लीम्बाराम विचार करू लागला. घुम्याचे अज्ञान त्याच्या लक्षात आले. आता घुम्याला आपली बाजू मांडून दाखवली पाहिजे असा विचार करून सुस्कारा सोडत लीम्बाराम बोलू लागला.
“घुम्या, तू म्हणतोस ना, की मी उद्या अस्तित्वात रहाणार नाही. मी त्याची पर्वा केलेली नाही. पण तू हेही लक्षात घे ! मी संपल्यावर तूच काय कोणताही जीव या पृथ्वीतलावर फार काळ टिकू शकणार नाही. त्या राक्षसाच्या आधी तुझ्यासारख्या करोडो जीवांचे अस्तित्व संपुष्टात आलेले असेल , माझे महत्व सगळ्याला समजेल. पण दुर्दैवाने तेव्हा मी तुम्हाला मदत करायला नसणार आहे.” लीम्बरामचा कापरा झालेल्या आवाजाने घुम्याला जाणवले की, माझ्या बोलण्याने लीम्बाराम खरोखरच दुखावला आहे. काही बोलण्यापेक्षा लीम्बारामचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे असा निश्चय केला.”
“तू म्हणतोस ना, आम्ही एका जागेवरच जन्मभर उभे असतो. बरोबर आहे. पण एका जागेवर उभे राहून करोडो वर्ष आम्ही या धर्तीवरील सर्व चराचरांना जागवण्याचे काम आम्ही करत आलो आहोत. त्याची किमंत कुणीच करू शकणार नाही. तुला एक उदाहरण देतो.  ५० वर्षात या राक्षसाला किती मदत करतो याची किंमत तुला राक्षसाच्या चलनात सांगतो. हे मानवराक्षस जगण्यासाठी देवाण-घेवाण करतात. हे राक्षस प्रत्येक गोष्टीची किंमत रुपयात करतात.” घुम्या एक शब्दही न बोलता लीम्बरामचे बोलणे शांतपणे ऐकत होता. लीम्बाराम ऐकटाच बडबडत होता.
“मला तू प्रश्न केलास की मी तुझ्यासाठी काय केले ! मी तुझ्या एकट्यासाठी म्हणून काहीच करीत नाही. या पृथ्वीतलावर जे जे म्हणून जीव आहेत त्या सर्वांसाठीच मी प्रत्यक्षपणे काम करीत असतो. इथल्या सर्व जीवांवर आमचे असंख्य उपकार आहेत. पण माझे काम सर्वाना अप्रत्यक्ष वाटते. त्यात तुला तसे वाटले तर नवल कसले.” इतका वेळ लीम्बाराम ऐकटाच बोलत होता. घुम्याचा कसलाच प्रतिसाद मिळत नव्हता.
घुम्या ! लिंबारामने आवाज दिला.
हं ! “बोल, मी ऐकतोय.” घुम्या तेवढाच बोलला.
“माझ्या बोलण्याचा तुला एवढा राग आला ! खरं तर मला राग यावयास हवा होता. एक सांगू, मी तुझ्यासाठी बोलत नव्हतो. त्या दुष्ट राक्षसासाठी बोलत होतो. तू निष्कारण स्वतःवर ओढवून घेतले. अरे वेड्या ! तू माझा जिवलग आहेस. तुझ्याबद्दल माझी कसलीच तक्रार नाही आणि नसणार आहे. कारण, निसर्गाने तुला माझ्या सहकार्यासाठी निर्माण केले. आहे. अरे वेड्या, मला माहित नाही का ? तुझ्या बांधावामुळेच माझ्यासारख्या अनेक वृक्षांचे वंश या पृथ्वीवर टिकून आहेत. तुमच्यामुळेच आमचा प्रसार या मातीत झाला. मी कसा तुझ्यावर रागवेन ? तुमचे आमच्यावर खरंच मोठे उपकार आहेत. मी अजिबात नाकारत नाही. पण आम्ही वृक्ष तुमच्यासाठी काहीच करीत नाही हा मोठा गैरसमज तुमच्या मध्य आहे तो गैरसमज मी आज दूर करणार आहे.  पण माझं अस्तित्व तुला जाणवून द्यायचे आहे. ऐकतोयस ना ?  लीम्बाराम म्हणाला.
“ऐकतोय म्हटले ना !” थोडा चिडल्यासारखा आवाज करीत घुम्या बोलला.
“घुम्या, चल आपण छोटासा खेळ खेळू या.”
“मला नाही खेळायचा तुझ्याशी खेळ. आधी माझ्यावर चिडलास का ते सांग? मग मी तुझ्याशी खेळतो.” घुम्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्याचे गोबरे गाल रागाने आणखीनच लाल झाल्याचे लीम्बाराम्ला दिसले. त्याचा अवतार पाहून लीम्बाराम्ला त्याची खूपच दया आली. घुम्याला कुशीत घेतले आणि कोवळ्या पानांनी त्याला कुरवाळू लागला.
“नाही रे राजा. तुझ्यावर कसा रागवेन. तू माझे काहीच वाईट केले नाहीस. उलट तुमच्या सेवेसाठीच देवाने निर्माण आम्हाला निर्माण केले आहे. तुझ्यावर माझा यत्किंचितही राग नाही. पण तो राक्षस माझ्या जीवावर उठलाय. त्याच्यावर आमचे अतोनात उपकार आहेत. ते त्यालाही माहित आहेत. त्याला माहित आहे. आमच्याशिवाय या पृथ्वीवर जगू शकणार नाही. तरी हि तो आंधळा झाला आहे. आम्ही नसल्यावर तो गुदमरून मारणार आहे हेही त्याला माहित आहे. तरीही तो स्वतःचा सर्वनाश करण्यासाठी सिद्ध झाला आहे. त्याचे कारण म्हणजे, स्वार्थ. तो इतका स्वार्थी आहे कि, स्वतःच्या  मृत्यूचेही ही भय त्याला वाटत नाही. घुम्या, तुला सांगतो. मला संपवल्यास या राक्षसाचा सर्वनाश झाल्याशिवाय रहाणार नाही. तुझ्या लक्षात असू दे.” लीम्बाराम अत्यंक त्वेषाने बोलत होता. त्याच्या मनातील खदखद त्याच्या प्रत्य्रेक शब्दात जाणवत होती. लीम्बरामचा अविर्भाव बघून घुम्या आवक झाला होता. तो थोडा मनातून घाबरला होता. त्यामुळे घुम्याने शांत राहण्यातच भलाई समजली.
लीम्बारामने घुम्याला आणखी जवळ घेतले.त्याच्या पंखावरून हात फिरवला.
“तुझे डोळे पूस बरं आधी.” असे म्हणत लिंबारामनेच घुम्याचे डोळे पुसले.
“घुम्या, आता आपण छोटासा खेळ खेळू. मला सांग, तू कितीवेळ नाक दाबून धरशील बर!”
“हा कसला खेळ. कितीही वेळ मी नाक दाबून धरीन.” ” घुम्या थोडा आश्चर्याने म्हणाला.
“ठीक आहे. धर बरं !
लगेच घुम्याने आपल्या नाकपुड्या दाबून धरल्या. लीम्बाराम मात्र गालातल्या गालात हसू लागला. तो  घुम्याकडे कौतुकाने बघत होता. घुम्याने नाक दाबून धरले होते पण अगदी काही वेळातच घुम्याने नाकपुड्यावरील हात बाजूला करत मोठा सुस्कारा सोडला.
“फार कठीण आहे बुवा !” मला वाटलं खूप वेळ तसाच राहीन. अगदी गुदमरल्यासारखे वाटते.  नाक दाबून ठेवणे मला शक्य नाही.”
“आता समजलं का माझे महत्व.”
“यामध्ये तुझा प्रश्न येतोच कुठे ?”
“तुलाच काय, कुणालाही विचारले तर ते असेच म्हणतील. घुम्या तू जी हवा नाकातून घेतोस ना, त्याला ‘श्वास’ म्हणतात. आणि तुझा श्वास म्हणजे माझे अस्तित्व आहे. समजल की नाही ?”
“मी समजलो नाही. माझ्या श्वासाशी तुझा काय सबंध?
“घुम्या, तुझ्या डोळ्यांनी जे दिसत त्याला तुम्ही अस्तित्व समजता. त्याला तुम्ही जगण्याचे मध्यम समजता. पण वास्तवात एक अदृश अशी शक्ती आहे ज्याच्यामुळे तुम्ही अस्तिवात आहात.”
“मी असही ऐकलय की, या निसर्गात देव आहे. पण त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. म्हणजे,  लीम्बाराम, देव देव म्हणतात ते तूच देव आहेस का ?” घुम्या कुस्तिकपणे हसतो.
“तुझं हसून झाले की, सांग मला !
“नाही रे ! आपलं असंच हसलो. गैरसमज करू नकोस.”
“तू म्हणतोस तसा, मी नक्कीच देव नाही. अरे ! देवानेच तुला, मला आणि या सर्व सृष्टीला जन्माला घातले. तेव्हा मी देवा नाही. पण मी नसलो तर देवच काय कुणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही.
“लीम्बाराम ! आज तुला नक्की काय झालय ? मघापासून तू आत्मप्रौढी मिरवत आहेस. तुला इतकं गर्वाने बोलताना कधीच पाहिलं नाही. तुझा मानसिक तोल ढळायला लागलाय. माझ्यामुळे तुला उगीच त्रास झाला. मी आपला जातोच कसा.” असं म्हणत घुम्या लीम्बारामच्या कुशीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. लीम्बाराम्ने त्याला आपल्या कुशीत ओढले आणि घट्ट मिठी मारली.
“घुम्या, माझा असा त्रागा करू नकोस. तुला माहित आहे. मी काही क्षणांचा सोबती आहे. तेव्हा शेवटच्या क्षणाला मला गर्व नाही आणि मृत्यूचे भय हि नाही. मी जे काही सांगतो ते तुला पटणारे नसले तरी ते सत्य आहे. आणि हे सत्य तुला माहित असणे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण मी जे सांगणार आहे ते तुला आपल्या येणाऱ्या पिढीला सांगायचे आहे. तेव्हा मी या राक्षसाच्या पापाचा संपूर्ण पाढाच तुला वाचून दाखवणार आहे. तेव्हा मी सांगतो ते निट लक्ष देऊन ऐक. मी संपताना काही क्षण तुझ्या सानिध्यात घालवल्याचे सुख मला साठवून ठेवायचे आहे.

“मघाशी म्हणालो ना, तूच काय, या पृथ्वीतलावरचा कोणताही जीव माझ्याशिवाय जगू शकणार नाही.



















बराच वेळ दोघेही शांत होते. कोणीच काही बोलत नव्हते.
लीम्बाराम,हा मानव राक्षस पहिल्यापासून असाच आहे का? हळूच आवाजत घुम्याने प्रश्न केला.
“त्याच असं आहे घुम्या! ही पृथ्वी परमेश्वराने निर्माण केली असं म्हणतात. त्यानेच  तुला, मला आणि या दुष्ट मानवाला अर्थात या राक्षसाला निर्माण केले.”
म्हणजे, या विश्वाचा निर्माता परमेश्वर नावाचा कोणीतरीआहे असं तुला म्हणायचे आहे का? घुम्या आणखीनच बुचकळ्यात पडला.
“हो! परमेश्वर म्हणजे साक्षात देवच. त्यानेच... त्यानेच या पृथ्वीवर या दुष्ट मानव राक्षसाला जन्माला घातलं. या राक्षसानेच साऱ्या विश्वाचा संहार चालवलाय. असं म्हणतात की, मानवाची निर्मिती म्हणजे या पृथ्वीतलावरील देवाची सुंदर उत्पत्ती आहे.”
“ही कसली सुंदर निर्मिती. हा तर “राक्षस” आहे. “राक्षस.”, त्या तुझ्या परमेश्वराने या सुंदर सृष्टीच्या विनाशासाठीच त्याची निर्मिती केली असावी.  तुझ्या त्या परमेश्वराने या राक्षसाला; पृथ्वीवर पाठवायला नको होतं. त्त्याचाशिवाय आपण सगळे गुण्या-गोविंदाने राहिलो असतो.”घुम्या तिरस्काराने बोलला.
“हा राक्षस काही एका रात्रीत जन्माला आला नाही. त्याला या पृथ्वीवर जन्म घ्यायला कोट्यावधी वर्ष लागली.”
“कानामागुन आला अन् तिखट झाला, असंच ना !  लीम्बाराम, मला जरा समजल असे सांग! या राक्षसाला कुणी जन्माला घातला!तो या पृथ्वीवर कसा प्रकट झाला. निट सांगितल तर बर होईल.माझी आता पूर्ण खात्री झाली आहे. तुला बरच काही माहित आहे. जे मला माहित नाही. आता तुझा मला अभिमान वाटायला लागलाय.खरंच तुझ्याकडे माहितीचा खजिनाच आहे.”
घुम्याच्या बोलण्याने लीम्बाराम थोडा भावनिक झाला. त्याच्या पानांच्या कडा पाणावल्या होत्या. त्याला हुंदका आला होता. पण तो बाहेर येऊ नये म्हणून तो आटोकाट प्रयत्न करीत होता. त्याचे अंग थरथरत होते. त्याने आपली पाने घट्ट मिटून घेतली आणि आलेला हुंदका गिळून टाकला. आपली मानसिक स्थिती घुम्याला कळू नये म्हणून लीम्बराम आटोकाट प्रयत्न करीत होता. मात्र घुम्याने ही गोष्ट अचूक टिपली होती. आणि तो हि थोडा स्तब्ध झाला होता. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हते. थोड्या वेळाने दोघेही सावरले.
“माझं काही चुकल का?” घुम्याने थोड्या बारीक आवाजात लीम्बाराम्ला विचारले.
“तू म्हणतोस !माझ्याकडे माहितीचा खजिना आहे. पण त्याचा आता काय उपयोग. माझी तर ही शेवटचीच रात्र आहे. उद्याचा दिवस माझ्या नशिबात नाही. हे तुला हि माहित आहे. लीम्बाराम आवंढा गिळत बोलला.
“असं बोलू नकोस लीम्बाराम ! मला खूप दु:खहोतय.इतका वेळ आपल्या गप्पांच्या नादात सगळं काही विसरून गेलो होतो. पण तू मला जाणीव करून दिलीस.लीम्बाराम ! या दुष्ट राक्षसाने किती भयंकर संहार चालवलाय, किती भयंकर अवस्था केलीय. तुझं माझं अस्तित्वच संपवायला निघालाय. किती अत्याचार चालवलाय याने. एक दिवस हा राक्षस तडफडून मरेल. माझा शाप आहे या राक्षसाला.
“हो, तू म्हणतोस तसं, हा राक्षस तडफडूनच मारणारच आहे. पण तो मारताना तू किंवा मी नसणार आहे. याचे मला राहून-राहून दु:ख वाटते. जे व्हयाचे ते होऊदे,  आता त्याचा विचार करून काय उपयोग, तुझ्या –माझ्या हातात काय आहे. या राक्षसाने या विश्वावरच ताबा मिळवलाय. त्यात तुझं – माझं अस्तित्व फारच क्षुल्लक आहे.”
लीम्बारामने एक हुंकार सोडला. इकडे तिकडे नजर टाकली. नजर जाईल तिथपर्यंत अंधाराचे साम्राज्य होते. कसलीही हालचाल जाणवत नव्हती. चंद्र मध्यावर आला होता. पण तो ढगांनी झाकला होता. त्यामुळे अंधुक अंधुक वातावरण होते.
लीम्बाराम ! “मला या राक्षसाच्या उत्पत्तीबद्दल सांगत होतास. जरा मला समजेल असं सांग बरं.”
सांगतो, सांगतो’ तुला समजेल असंच सांगतो !“हजारो वर्षापूर्वी, आजचा हा दिसणारा राक्षस, ‘माकड’  होता. माकड.” लीम्बाराम.
काय माकड? हे कसे शक्य आहे. आता सुद्धा माकडं दिसतातच की, ती का बरं राक्षस झाली नाहीत.त्यांना लांब लचक शेपटी आहे. त्यांच्या अंगावर दाट केस आहेत. मात्र या राक्षसाला तर शेपूटही नाही आणि अंगावर केस ही नाहीत. त्यामुळे तू जे सांगतो आहेस ते मला काही पटत वाटत नाही.”
“त्याचं असं आहे घुम्या, ही माकडेसुद्धा काय एका दिवसात तयार झाली नाहीत. माकड व्हायला करोडो वर्ष लागली. आणि माकडापासून हा राक्षस व्हायलादेखील करोडो वर्ष लागली.”लीम्बाराम्ने एका दमात सांगून टाकले.
“माझं आता डोक फुटायची वेळ आलीय. एकदा तू म्हणतो की याची उत्पत्ती माकडापासून झाली. पुन्हा म्हणतोस, याला करोडो वर्ष लागली.” याला काही आधार आहे का?
हो, आहे ना ! ‘म्हणून तर तुला सांगतोय.’ आता तू थोडे शांत राहा. मी तुला सगळं विस्ताराने सांगतो.अगदी तुला समजेल असं सांगतो.असं म्हणत लीम्बाराम सांगू लागला.

“आपल्याला जो रोज उगवणारा आणि मावळणारा सूर्य दिसतो तो फक्त एकच दिसतो. त्यालाच आपण विश्व समजतो. या विश्वाला थांग नाही. या विश्वात आपल्याला दिसणाऱ्या सूर्यासारखे अगणित सूर्य आहेत. या विश्वाचे निर्मिती १३०० ते १४००  कोटी वर्षापूर्वी झाली असे अनेक विद्वान राक्षस मानतात. आणि हा आपला जो सूर्य आहे ना ! तो, ५०० कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला आहे.”
बापरे ! “या विश्वात अगणित सूर्य आहेत ? मला वाटायचं की, या विश्वात फक्त आपणच आहोत.” घुम्या लीम्बरामचे बोलणे मधेच तोडत बोलला.
“ आपण ज्या पृथ्वीवर रहातो; ती याच सुर्यापासुन निर्माण झाली.” लीम्बाराम
“म्हणजे सूर्य हा पृथ्वीचा पिताच म्हणायचं की !”
“अगदी बरोबर ! साधारणतः  ४०० ते  ४५० कोटी वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीचा जन्म या सूर्यापासून झाला.
“खूपच वर्ष झाली की ! मला वाटले आत्ताच कुठे सुरुवात झाली असेल.” घुम्या.
या पृथ्वीतलावर पहिल्यांदा कोण निर्माण झाले असेल सांग बरं घुम्या ?
“मला तर वाटते हा राक्षसच निर्माण झाला असेल !”
छे ! “अजिबात नाही. हा राक्षस या पृथ्वीतलावर सर्वात शेवटी आलाय, तुझ्या माझ्या आणि अनेक जीवांच्या नंतर त्याचे अस्तित्व निर्माण झाले.  लक्षात ठेव.  पण, या राक्षसाने या विश्वाची सगळी सूत्रच आपल्या हातात घेतली आहेत.” या नीच राक्षसाच्या नव्हे तर या विश्वाच्या निर्मितीनंतर पहिला वहिला जन्मलेला  जीव हा माझा बांधव होता.  त्याला शेवाळ असं  म्हणतात. आणि  नंतर मग तो तुझा बांधव “अमिबा का फिमिबा” तयार झाला.” लीम्बाराम थोडा आवाज चढवून शेवटचे शब्द म्हणाला.
घुम्यालाही लीम्बारामच्या शब्दातील चढ उतार जाणवला तो मनात खट्टू झाला. आणि काहीच न बोलता गप्प झाला. लीम्बारामने एकदा घुम्याकडे पहिले. घुम्या गाल फुगवून बसला होता. मग लीम्बाराम्ने त्याला आपल्या पानांच्या मिठीत घेऊन जवळ ओढले. तसं घुम्या रडू  लागला. लीम्बारामलाही थोडं  गलबलल्यासारखे  झाले. त्याची चूक त्याला जाणवली. उगीच आपण असं बोललो असे राहून राहून वाटायला लागले.
घुम्या ! मित्रा मला माफ कर. खरंच मला तस काही म्हणायचे नव्हते. उगीच माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नकोस.”
“मला माहित आहे. तू मुद्दामच बोललायस. मी पण प्राणी कुळातला आहे याची तू मला जाणीव करून दिसलीस. त्या राक्षसाचा राग माझ्यावर कशाला काढतोस.” घुम्या हुंदके देत आणखीनच रडू लागला.
“बरं बाबा चुकलं ! पुन्हा नाही बोलणार असं. मग तर झालं.  तू म्हणतों तसं , या राक्षसाचा राग माझ्या मनात आहे. पण तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू आणी तुझे बांधव सगळे कसे निसर्ग नियमाने वागता. तसा या विश्वात निसर्गनियम पायदळी तुडविणारा आणि त्यांची पायमल्ली त्या परमेश्वराचा लाडका मानव राक्षस करीत आला आहे. आणि त्यानेच तुझ्या नि माझ्या अस्तित्वाला धोका निर्मार्ण केला आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड चीड आहे. कदाचित, त्यामुळे माझा आवाज वाढला असेल.”
“माझा काही त्रास नाही हे तुला मान्य आहे. मग राक्षसाचा राग माझ्यावर काढायची काय गरज होती का?
“चुकलं माझं! मला माफ कर. पुन्हा नाही बोलणार. मग तर झालं. अनहित तर मी कुठे असणार आहे उद्या तुला बोलायला.
लीम्बारामच्या बोलण्याने घुम्याला आणखीनच भरून आले. “नको असं बोलूस लीम्बाराम ! माझच चुकलं ! मी गैरसमज करून घेतला तुझ्या बाबतीत. घुम्या लीम्बाराम्ला आणखीनच बिलगला. लीम्बाराम्ने त्याला आणखीनच आपल्या कुशीत ओढले. आणि कुरवाळू लागला. बराच वेळ कुणीच काही बोलले नाही. मग लीम्बारामनेच तोंड खोलले.
आज जी आपण पृथ्वी बघतो ना; ती पृथ्वी, जन्माच्या वेळी एक तप्त गोळा होता. तो गोळा थंड व्हायला जवळपास १०० ते १५० कोटी वर्ष लागली.   आणि त्यानंतर पृथ्वीवर पाणी निर्माण झाले. त्या पाण्यात अनके रासायनिक प्रक्रीयानंतर शेवाळ नावाचा माझा बांधव तयार झाला. त्याला सुधा जवळपास ३००ते ३५० कोटी वर्ष लागली. त्या शेवाळा मध्ये काही बदल होऊन जीवाणूंची आणि तुझ्या कुळातील पहिला एकपेशीय प्राणी म्हणजेच ‘अमिबा’ तयार झाला. आणि अमिबा पासून राक्षसाच्या उत्पत्तीचा इतिहास मी तुला आधीच सांगितला आहे.”  आठवतंय ना ? लीम्बाराम घुम्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. 
“पूर्वी मलाही असंच वाटायचे. पण वृक्षाराजानीच ही माहित मला दिली होती. तुला तर माहित आहेच वृक्षराज हे महान तपस्वी होते. त्यांनी एका जागेवर उभे राहून हजारो वर्षांची तपश्चर्या केली होती. त्यामुळे त्यांच्या पिढी दर पिढी हि माहिती आपल्या पर्यंत पोहचली.” लीम्बारामने मिळवलेल्या ज्ञानाचा खुलासा केला.
घुम्याला आता वृक्षराजाबद्दल खूपच सहानुभूती वाटायला लागली होती. त्याचे लक्ष निश्चल पडलेल्या वृक्षराजांच्या देहाकडे गेले. या राक्षसाने या तपस्वीची काय अवस्था केली आहे. महाकाय धूड वाढलेल्या जटासह त्या काळ्या सापाच्या कडेला लचके तोडलेल्या अवस्थेत पडले होते. हळूहळू  कण्हत असल्याचा  आवाज येत होता. विद्वान आणि ज्ञानी असलेला सोबती उद्या आपल्याला दिसणार नाही याची सल घुम्याच्या मनाला राहून राहून वाटत होती.
 “बर पुढे.” घुम्या भानावर येत बोलला.
 “या विश्वाची निर्मिती झाल्यानंतर कित्येक कोटी वर्षांनी पाण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अनेक प्रक्रियातून एका सूक्ष्म जीवाची निर्मिती झाली.हा जो सूक्ष्म जीव होता त्याला कसलाच आकार नव्हता.”  अगदी कसाही आकार बदलणारा तो एकपेशी प्राणी होता. “त्याला अमिबा म्हणतात.” लीम्बाराम्ने सांगून टाकले.
घुम्या बुचकळ्यात पडला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांनी जागा घेतली. “म्हणजे तुला असं म्हणायचे की. या एकपेशी प्राण्यापासून या राक्षसाची निर्मिती झाली. आणि, जर ती झाली असेल; तर ते कसे शक्य आहे.
“मग या राक्षसाचा जन्म कसा झाला.” घुम्या
त्याचे कसे आहे घुम्या. हा जो एकपेशीय प्राणी होता; त्यामध्ये ह्ळूह्ळ बदल होत गेले. या बदलानाच आपण उत्क्रांती म्हणतो. हे जीव पाण्यामधून उत्क्रांत होत गेला आणि कोटय़वधी वर्षानी तो उत्क्रांत होत होत अनेक प्राण्यांची निर्मितीत करीत गेला. त्याच पद्धतीने माकडाचीही निर्मिती झाली. आणि पुढे माकडापासून मानवाची निर्मिती झाली. 
म्हणजे माकड या राक्षसाचा पूर्वजच म्हणायच का?  घुम्या.
अगदी बरोबर. लीम्बाराम.
मग आता जी माकडे दिसतात ती का माणूस झाली नाहीत.? पुन्हा घुम्याने प्रश्न केला.
घुम्या, मी मघाशीच सांगितालेना, की, वातावरणातील बदलानुसार प्राण्यामध्ये काही बदल होत गेले. पण हे बदल अत्यंत मंदगतीने, हळूहळू होत गेले. हे त्या प्राण्याच्या गरजेनुसार अवती-भवतीच्या वातावरणानुसार व अधिवासानुसार हे बदल होत गेले आणि या बदलांना ‘उत्क्रांती’ असे म्हणतात. मात्र मानवाचा मेंदू इतर प्राण्याच्या तुलनेत मोठा व अधिक शक्तिशाली असल्यामुळे त्याच्यामध्ये खूपच झपाट्याने उत्क्रांती झाली. लीम्बाराम्ने मानव राक्षसाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला.
आता सगळीच माकडे मानव का झाली नाहीत या प्रश्नाकडे मी वळतो. म्हणत लीम्बाराम सांगू लागला. “त्याचं असं आहे, ज्या  माकडांना पूरक व पोषक वातावरण मिळाले त्यांना बदल करून घेण्याची गरजच भासली नाही. मात्र ज्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती त्या वातावरणात काही प्राण्यांना वातावरणाशी व सभोवातालीच्या अधिवासाशी मिळते-जुळते करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांच्यामध्ये बदल होत गेले. आणि त्यांचे मूळ रूप बदलून नव्या रुपात त्या-त्या परिसंस्थामध्ये वावरू लागले.
लीम्बाराम, हे सगळ ज्ञान तू कुठून प्राप्त केलेस रे बाबा. मला तर तुझं खूपच नवल वाटू लागले आहे. माझ्या मनातल सांगू का ! मला तू  आजपर्यंत खूपच बुद्दू वाटायचा. कारण, तू कुणाशीच बोलत नसायचा. आणि बोलला तरी अगदी थोडकच बोलायचा. त्यामुळे तुला सगळे टाळण्याचा प्रयत्न करायचे. कारण तू कुणाशीच चांगले बोलताना पहिले नाही. तू खूप कडवट बोलतो असं सगळे म्हणतात, म्हणून तुझ्याकडे क्वचितच कुणीतरी यायचे. आणि चुकून आलाच तर तू त्यांच्याशी कधीच नीट बोलायचा नाहीस. घुम्या.
घुम्याच्या या वक्तव्याने लीम्बारामचा चेहरा थोडा बारीक झाला. इतका वेळ एखाद्या ज्ञानी सारखा बोलणारा लीम्बाराम थोडा शांत झाला. हे घुम्याच्याही लक्षात आले.
लीम्बाराम, बोलत का नाहीस ? काही चुकले का? घुम्याने प्रश्न केला. तरीही लीम्बाराम गप्पच होता. लीम्बारामच्या शांत रहाण्याने घुम्यासुद्धा थोडा कासावीस झाला. काहीतरी चुकीचे बोललो याची त्याला जाणीव झाली. घुम्या लीम्बरामची गयावया करू लागला.
लीम्बाराम, चुकलं माझं. पुन्हा नाही बोलणार असं. पण तू असं गप्प राहू नकोस. कारण आता तुझ्याशिवाय मला कोणाचाही आधार नाही. आणि तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी सोबतीही नाही. मला माफ कर.
खूप वेळ गप्प राहिलेला लीम्बाराम बोलू लागला. “घुम्या, तू म्हणतोस ते काही चुकीचं नाही. खरंच मी आजपर्यंत कुणाशीच निट बोललों नाही. त्याला कारणही तसेच आहे.”
लीम्बाराम् दूरवर बोटाने खुण करून म्हणाला, घुम्या, तुला आठवतंय का? वृक्षराज्याच्या पलीकडे एक झाड होते.
“हो, आठवतय ना. ती चिंचाई होती.”
आणि चिंचाईच्या पलीकडे?
“बोराई”
त्यांची काय अवस्था होती माहित आहे का तुला?
“नाही, मला कसं माहित असणार. मी तर रात्री फिरणारा. हा, पण मला आठवतंय. त्या राक्षसाची पिल्ल त्यांना दगड मारायचे. त्यातले काही दगड मलाही लागलेत. हे बघ ना! डोक्याला पडलेली खोच लीम्बारामला दाखवत घुम्या म्हणाला.
“अरे ! चिंचाई आणि बोराई त्यांच्याशी सारख्या गोड गोड बोलायच्या. कधी कधी आंबट ही बोलायच्या. पण त्या राक्षसांच्या पिल्लावर काहीच परिणाम व्हायचा नाही. उलट त्यांना आणखीनच गंमत वाटायची. आणि उड्या मारत पुन्हा पुन्हा दगड मारायची. म्हणून मी कुणाशीच निट बोलायचो नाही. त्या राक्षसांच्या पिल्लांचा काय नेम सांगावा. त्यामुळे कुणीच माझ्याकडे ढुंकून ही बघत नसायचे” लीम्बारामाने आपले गुपित सांगून टाकले.
लीम्बारामची  युक्ती ऐकून घुम्या पोट धरून हसायला लागला. आणि लीम्बाराम ही सगळे दु:ख विसरून हसायला लागला.
“लीम्बाराम ! मी म्हटले ना, तू खूप हुशार आहे.” तुझ्या कल्पनेला दाद ध्यावी तेवढी कमीच आहे.
. “आता माझ्या हुशारीचा काय फायदा. माझी ही हुशारी, मला त्या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. तो इतका क्रूर आहे की, आपले त्याच्यावर अनंत उपकार असताना, त्याची त्याला चाड नाही. त्याच्यासाठी आम्ही काय केलं नाही. आम्ही आहोत म्हणून हा जिवंत आहे. हा राक्षसच काय पण तुझ्यासारख्याना आमच्यामुळे हे जीवन उपभोगता येते. एक दिवस काळच याचं उत्तर देईल. त्याच्या या कर्माचे फळ भोगावे लागेल. तुझं काय, तू जाशील उडून. मी कुठे जाणार. मला देवानेच शाप दिलाय. एका जेवर उभे राहण्याचा. किती वर्ष झाली मी असाच उभा आहे, या राक्षसाला सावली देत.” लीम्बाराम पुन्हा खिन्न  भाऊक झाला होता. त्याचा कंठ दाटून आला होता. त्याच्या ओठातून शब्द फुटत नव्हता. थोडा वेळ शांतता पसरली. मग लीम्बाराम स्वतःला सावरत म्हणाला.
“घुम्या ! तू काही काळजी करू नकोस. आज मी ठरवलय. रात्रभर झोपायचे नाही. आजची रात्र तुझ्या सहवासात घालवायची.कारण पुन्हा संधी नाही. या राक्षसाच्या बद्दल सगळं सांगून टाकयचे. आता फक्त तू आणि मी. तू झोपणार तर नाहीस ना !
“मी कसा झोपेन. तू संकटात असताना मला कशी बरं झोप लागेल. तुलाही माहित आहे. मी रात्रीच्या अंधारात झोपत नाही म्हणून. आणि झोप आलीच तर मी माझे डोळे फोडीन. पण मी झोपणार नाही.”
“ते काही असुदे! मी जे सांगणार आहे तू लक्ष देऊन ऐक. एकमेव तूच माझा संदेश पुढे घेऊन जाणार आहेस.तुला, या क्रूर राक्षसाची कर्म कहाणी सर्वाना सांगायची आहे.
“हं ! तर मी काय सांगत होतो.”
“राक्षसाच्या उत्पत्तीबद्दल.” घुम्या म्हणाला.
बरोबर.! तर प्राथमिक जीवांची निर्मिती झाल्यानंतर जवळपास १५० ते २०० कोटी वर्ष त्याचं या पृथ्वीवर वास्तव्य राहिलं. त्यानंतर जीवयुगाचा उगम झाला आणि ६०  कोटी वर्षापासून ते २०  कोटी वर्षापर्यंत थोडे गुंतागुंतीचे जीव उदयास आले. त्याकाळात आज जी आपल्याला जंगले दिसतात तशी जंगले नव्हती, तुझ्यासारखे पक्षीसुद्धा नव्हते.”
“म्हणजे आमचे पक्षी गण सुरुवातीपासून नव्हते? जर तू म्हणतोस तसे असेल तर मला आमच्या उत्पत्तीबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल. सांगशील ना? घुम्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.
सांगतो ! सगळं  सांगतो ! तुला या विश्वाच्या आणि या राक्षसाच्या निर्मितीबद्दल सारं काही सांगणार आहे. आणि त्याने केलेल्या अत्याचाराचा पाढाच तुझ्यापुढे वाचून दाखवणार आहे.” लीम्बारामने सांगून टाकले.
हं ! तर साधारणतः २०ते २५  कोटी वर्षापासून ते अलीकडे अगदी ५ कोटी वर्षाचा काळ हा विचित्र होता. या काळात पृथ्वीवर एका महाकाय प्राण्याचे वास्तव्य होते. हा जो कालखंड होता ना, तो सरपटणाऱ्या प्राण्यांचा कालखंड होता. त्याला सरपटनाऱ्या प्राण्यांचे युग म्हणतात. या सरपटनाऱ्या प्राण्यांना ‘डायनोसोर’ म्हणून संबोधले जायचे. याचा कालखंडाला ‘डायनोसोरचे सुवर्ण युग’ म्हणूनही संबोधले जायचे. बराच वेळ लीम्बाराम बोलत होता. घुम्यानेही त्याला मध्ये टोकण्याचा प्रयत्नही केला नाही. तो कान देऊन लीम्बरामचे बोलणे ऐकत होता.

No comments:

Post a Comment

ते तुझे सरकार तू त्याचा लाभार्थी

ते तुझे सरकार तू त्याचा लाभार्थी लेखक ; प्रा. डॉ विधिन कांबळे. सांगोला महाविद्यालय, सांगोला                                    ...